Tuesday, 1 October 2013

Ahawal of VSM's 5th Vardhaapan Din

विद्यादान सहाय्यक मंडळ , ठाणे
विद्यादान सहाय्यक मंडळ , ठाणे यांचा पाचवा वर्धापनदिन १५ ऑगस्ट ,२०१३ रोजी साजरा करण्यात आला.
२००८ मध्ये ८ विद्यार्थ्यांना मदत करण्यापासून सुरवात करून यावर्षी ११५ विद्यार्थ्यांना मदत करण्याची संस्थेची तयारी चालू आहे. ठाणे, शहापूर व आसपासच्या गावातील मुलांबरोबरच आता देवगड ,रत्नागिरी ,पुणे ,चंद्रपूर अशा ठिकठिकाणच्या मुलांना मदत केली जाते. हुशार व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याबरोबरच त्यांच्यासाठी विविध शिबिरे , कार्यशाळा आयोजित केल्या जातात.तसेच प्रत्येक मुलाच्या संपर्कात एक पालक कार्यकर्ता असतो ,जो आपल्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाची , त्याच्या अडचणींची विचारपूस करतो ,मार्गदर्शन करतो.
वर्धापनदिन कार्यक्रमाची सुरवात दुपारी ठीक ३ वाजून ४५ मिनिटांनी झाली.
चेतना लाटे या एका विद्यार्थिनीनेच निवेदन केले.
१.        भाऊ नानीवडेकरांनी २०१२-१३ चे अहवाल वाचन केले.
    त्यातील काही मुद्दे :
·                                 यावर्षी कार्यकर्त्यांसाठीही २ कार्यशाळा घेण्यात आल्या .
·                                 विद्यार्थ्यांसाठी २ व्यक्तिमत्व विकास शिबिरे व एक व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
·                                 तसेच सोमनाथ येथील श्रम संस्कार शिबीराला १६ व डॉक्टर अविनाश सावजी यांच्या बदलापूर येथील
    शिबिरास २६ विद्यार्थी गेले होते.
·         IPH  संस्थेच्या वेध परिषदेतील निबंध स्पर्धेत ५ पैकी ३ बक्षिसे विद्यादानच्या मुलांनी पटकावली.
·         सुमारे ३० विद्यार्थी अर्धवेळ काम करून शिक्षणाच्या खर्चास हातभार लावतात.
·         वृषाल लोंढे या विद्यार्थ्याने डिप्लोमा इंजीनीअरिंग परीक्षेत कॉलेज मध्ये प्रथम आल्याबद्दल मिळालेले दोन हजार रुपयांचे बक्षीस संस्थेला देणगी दिले.
       भाऊ म्हणाले ; आम्ही या मुलांकडून खूप गोष्टी शिकलो उदाहरणार्थ : हार न मानणे , जिद्द बाळगणे ,सकारात्मक
   दृष्टीकोन ठेवणे .आम्ही त्यांना देण्यापेक्षा त्यांनी आम्हाला जास्त दिले आहे.
२.  यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते झाली.
·         नलिनी म्हणाली -येथील कार्यकर्त्यांना बघून माझ्याही मनात सामाजिक कार्य करण्याची इच्छा निर्माण झाली. मे महिन्यातील वक्तृत्व स्पर्धेत तिला प्रथम पारितोषिक मिळाले. TYBA करणारी नलिनी दहावीच्या काही मुलांना संध्याकाळी शिकवते.
·         संतोष हा बालमजूरनववी नंतर १२ वर्षांनी दहावी झाला व आता विद्यादानमुळे B.Sc. करत आहे.
·         कल्पना टरमाले जी दहावीपर्यंत गुराखीकाम करत होती , पण दहावीला ९२% मिळवले व आता डिप्लोमा इंजीनीअरिंगच्या तिसर्‍या वर्षाला आहे . पूर्वी तिला वाचायची आवड नव्हती पण आता तिच्या पालक कार्यकर्तीच्या आग्रहाने दर महिन्याला एकतरी पुस्तक वाचतेच.
·         मजूर आई वडील असलेला यवतमाळचा सूरज तेलंग- दहावीत ९५% मिळाले , अर्धपोटी राहून तो शिकत होता. विद्यादान मुळे आता पुण्यात SYBA  करत आहे व UPSC ची तयारी करत आहे.
    व्यवस्थेशी लढून पुढे जायचे आहे असे तो म्हणतो.
·         गौरी देशपांडे या यवतमाळच्या मुलीनेही विद्यादानमुळे मी आता इंजिनिअर होणार असे सांगितले.
३.  जयश्री सोमण ही शकीला शेखची पालक कार्यकर्ती म्हणाली शिबिरांमुळे मुलांबरोबर आम्हीही नवीन गोष्टी शिकतो. मुलांनी मिटींगमध्ये ४ वाक्येतरी बोलावीत असा आमचा प्रयत्न असतो ,म्हणजे त्यांचा धीटपणा वाढतो. मुलांबरोबरची देवाणघेवाण आम्हाला खूप मानसिक समाधान देते.
४. त्यानंतर बक्षीस समारंभ झाला. शैक्षणिक व इतर स्पर्धांची बक्षिसे देण्यात आली.
५. सत्यजित शहा यांनी विद्यादानवर स्वतः केलेल्या कवितेचे वाचन केले.
६. वेळेच्या व्यवस्थापनाचे महत्व सांगणारे पथनाट्य ५ मुली व ४ मुलांनी करण परदेशीच्या मार्गदर्शनाखाली सादर केले.
७. आनंद सपाटे , करण व त्यांच्या मित्रांनी विद्यादानवर स्वतः बनवलेली चित्रफित दाखवली. तुटपुंज्या सामग्रीनिशी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
८. अनिकेत आगटे याने तयार केलेल्या विद्यादानच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.
९. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्या रेणू दांडेकर यांची मुलाखत गीता शहा यांनी घेतली. त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी अकरावीत असतानाच ठरवले होते की खेड्यात जाऊन काम करायचे. लोकमान्य टिळकांचे गाव चिखलगाव येथे त्यांनी मुलांसाठी वेगळया प्रकारची शाळा सुरु केली. क्षणोक्षणी शिकवते व बाहेरच्या जगात जगण्यास योग्य बनवते ते शिक्षण. मुलांच्या पालकांशी त्या त्यांच्या भाषेत संवाद साधतात.
अनेक अभिनव उपक्रम त्यांच्या शाळेत आहेत  जसे : श्रमावर भर , प्रत्यक्ष प्रयोग करून पाहणे ,पुस्तकातील वनस्पती प्रत्यक्ष जाऊन पाहणे ,शेतात काम करणे, शाळेचे मैदान तयार करणे, शाळेला रंग लावणे , वाचनाचा तास व तेव्हा लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचणे, विद्यार्थी सभा , निवडणूक , १५ दिवसातून एकदा वर्तमानपत्र काढणे इत्यादी. सर्व बाबतीत मुलांची मते विचारात घेतली जातात. मुलांच्या मागणी वरून आता तिथे जीवनोपयोगी शिक्षण , तंत्रशिक्षण असेही सुरु केले आहे.येथील प्रत्येक विद्यार्थी दरवर्षी अनेक पुस्तके वाचतो.एका मुलीने तर १४४ पुस्तके वाचली आहेत. मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी आधी गोष्टी सांगायला सुरवात केली मग त्यांच्यासमोर पुस्तके ठेवली, हळूहळू ती आपोआप वाचू लागली.
तुमचे आदर्श कोण यावर त्या म्हणाल्या , आईवडील ,नवरा व मुले. रिकाम्या वेळेत त्यांना बागेत काम करायला आवडते. निवृत्त झाल्यावरही मुलांबरोबर काम करतच रहाणार असे त्या म्हणाल्या.
रेणूताईंनी  विद्यादानच्या मुलांना तिथे सर्व बघण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले. व अशा संस्थांनी परस्पर देवाणघेवाणीतून शिकावे अशी आशा व्यक्त केली. ग्रामीण मुलांसाठी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याची त्यांची इच्छा आहे.

  विद्यादानच्या वाटचालीत आजवर अनेकजण सामील झाले आहेत . पण अधिकाधिक मुलांना मदत करण्यासाठी अनेक  कार्यकर्त्यांची व दात्यांची आजही खूप गरज आहे. उद्याच्या पिढीसाठी काही करू इच्छीणारे सर्वजण यात सामील होऊ शकतात.
- Written by Dhanashree Ketkar
Karyakarti, VSM.

No comments:

Post a Comment